Pune : शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटो मॉर्फ करून Facebook, WhatsApp, Twitter वर बदनामी; पुण्यात 13 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर काहीजणांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नावे आहेत. याबाबत आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भादवी कलम 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून या आरोपींनी बदनामी केली आहे. फेसबुक, Whatsapp, ट्विटरवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणण्यासाठी त्यांचे फोटो मॉर्फ करून तसेच घाणेरड्या व अश्लील पोस्ट प्रसारित केल्या होत्या. तसेच सोशल मीडियावरील विविध ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातीत तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट केल्या आहेत.

फेसबुकवरील काही ग्रुप, व्हाट्सअपवरील ‘Intelectual Forum’ ग्रुप व ट्विटरवर आरोपींनी बदनामीकारक मजकूर प्रसारित केला होता. याबाबत आकाश शिंदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास करत या 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत.