पुण्यातील ‘टॉप’च्या सराफाला 50 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सध्या ‘राष्ट्रवादी’पासून दुरावलेला ‘तो’ बडा नेता ‘रडार’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला पिस्तूलाच्या धाकाने ५० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सध्या दुरावलेला एक बडा नेता खंडणी विरोधी पथकाच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस दलातील सुत्रांनी आहे. संबंधित नेत्याने 2015 ते 2017 कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे मोठे पद भूषविले आहे.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आशिष हरिचंद्र पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, सहकारनगर), रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, रा. तुळशीबाग वाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) यांना यापूर्वीच अटक केले आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणारया 42 वर्षीय सराफ व्यावयासिकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आशिष पवार पुर्वी सराफ व्यावसायिकाकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. रमेश पवार हा सराफ व्यावसियाकाच्या घरात काम करत होता. तर चौधरी सामाजिक कार्यकर्ता आहे.

आरोपींनी सराफाला खंडणी मागण्याआधी ‘त्या’ बड्या नेत्याची भेट घेतली होती. त्यावेळी संबंधित नेत्याने सराफाला चौधरी चांगला ओखळीचा असून माझी सर्व कामे पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर आशिष, रुपेश आणि रमेशने संगनमत करुन सराफाच्या घरातील एका महिलेची व्हिडिओ क्लीप तयार केली. त्यानंतर ती व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन सराफाकडे 4 मार्चला 50 कोटी रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यास गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सराफाने गुन्हे शाखेच्या वरिष्ठांकडे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाने तिघांना अटक केले. याप्रकरणी संबंधित ‘त्या’ बड्या नेत्याची चौकशी करण्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.