Pune News : उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पुन्हा एकदा आरपीआयला उपमहापैार मिळणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. पुणे महापालिकेत पदाधिकार्‍यांचे खांदेपालट करायला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. अवघ्या दहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकांच्या आधी भाजपने ‘भाकरी फिरविण्या’चा निर्णय घेतला आहे.

सभागृहनेते धीरज घाटे यांचा राजीनामा घेऊन त्यावर गणेश बिडकर यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यासोबतच उपमहापौरपदीही नव्या व्यक्तीची निवड होणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. शेंडगे यांनी सोमवारी रात्री राजीनामा पक्षाकडे दिला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आरपीआयला उपमहापौरपद देण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू होऊन भाजपनने हे पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आरपीआयकडून उपमहापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.