Pune : मागीलवर्षीच्या 25 सप्टेंबरच्या तुलनेत अधिक पाऊस होउनही तुलनेने आंबिल ओढ्याची पूरस्थिती आटोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मागीलवर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या पावसापेक्षा काल रात्री अधिक पाउस झाला. शहराच्या विविध ४५ ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून १० ठिकाणी झाडे पडली आहेत. मागीलवर्षी सप्टेंबरनंतर आंबिल ओढ्यातील गाळ काढून खोलीकरण केल्याने तसेच कात्रज येथील पेशवे जलाशयातील पाणी पातळी खाली ठेवल्याने अधिक पाउस होउनही आंबिल ओढ्यातील पूरस्थिती तुलनेने कमी करण्यात यश आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी सांगितले.

डॉ. शांतनु गोयल यांनी सांगितले, की पावसाचा अलर्ट असल्याने महापालिकेच्या सर्व उपायुक्त तसेच क्षेत्रिय कार्यालयांना सज्जतेचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहेत. आजही अधिकची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागीलवर्षी २५ सप्टेंबरला रात्री कात्रज परिसरात ७९ मि.मि. पाउस झाला होता, काल रात्री ९१ मि.मि. झाला आहे. तसेच धनकवडी- सहकारनगर या आंबिल ओढ्याच्या कॅचमेंट एरियामध्ये २४५ मि.मी. पाउस झाला आहे. मात्र, आंबिल ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे आणि लेकटाउन जवळ कल्व्हर्ट केल्याने कॅरिंग कॅपेसिटी वाढली आहे.

मागीलवर्षी पेशवे जलाशय पुर्ण भरला असल्याने कॅचमेंट एरियात झालेल्या पावसाचे पाणी थेट ओढ्यात आल्याने पूरस्थिती गंभीर झाली होती. हा अनुभव लक्षात घेउन पेशवे जलाशयाची पातळी ३ मीटरने कमी राहील यासाठी सायपन व्यवस्था केली आहे. काल रात्री झालेल्या पावसामध्ये याचा खूपच चांगला उपयोग झाला. कॅचमेंट एरियातील पाणी थेट तलावात येण्यास जागा उपलब्ध राहील्याने ओढ्याचा पूर थोपविणे शक्य झाले आहे.

मागीलवर्षीच्या पूरानंतर आंबिल ओढ्यावरील काही जुने आणि कमी उंचीचे कल्व्हर्ट काढून टाकण्यात येणार आहेत, तर काही ठिकाणच्या कल्व्हर्टची उंची वाढविण्यात येणार आहे. जेणेकरून कचरा अडकून ओढ्यात येणारा पाण्याचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल. तसेच ओढ्याच्या काठच्या भिंती बांधण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. साधारण ६० टक्के जागा ताब्यात आल्या आहेत. लवकरच या कामालाही सुरूवात करण्यात येईल, असे डॉ. गोयल यांनी नमूद केले.

अरण्येश्‍वर मंदिराशेजारच्या कल्व्हर्टचे काम हाती घेणार

काल रात्री झालेल्या पावसामुळे अरण्येश्‍वर मंदिरासमोरच्या रस्त्यावरून साधारण अडीच ते तीन फूट उंचीवरून पाणी वाहीले. येथील काही बंगल्यांमध्ये पुन्हा पाणी शिरले. तसेच रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर कचरा आणि गाळ वाहून आला. या कल्व्हर्टची उंची कमी असल्याने कचरा अडकल्यानंतर पाणी पुलावरून तसेच मंदिराच्या आवारातून वाहते. या कल्व्हर्टची उंची वाढविण्याचे तसेच ट्रेझर पार्क ते अरण्येश्‍वर मंदिरा दरम्यानच्या भागातील वहन क्षमतेला अडथळा ठरणारा कल्व्हर्ट काढून टाकण्यात येणार आहे. फुलपाखरू उद्यानाच्या लगतचा भराव ओढ्यात आल्यानेही ओढ्याची रुंदी कमी झाली आहे. हा भरावही काढून टाकण्यात येणार आहे. परंतू याठिकाणी मोठी झाडे असल्याने पुर्नरोपण व अन्य पर्याय तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. शांतनू गोयल यांनी नमुद केले.