देशसेवेनंतर पोलिसात दाखल झालेल्या कर्मचार्‍याला प्रशासकीय बदलीचा फटका ! बदल्याचं ‘महेश’पर्व सुरू असल्याची चर्चा

पुणे : (नितीन पाटील) – सालाबादाप्रमाणे पोलिस दलातील सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम एप्रिलपासून सुरू होऊन तो जून अखेरपर्यंत संपतो. फार झाले तर जुलै अखेरपर्यंत पोलिस दलातील सर्वच स्तरावरील बदल्यांचे ‘कामकाज’ संपते. यंदा कोरोनामुळं सर्वच म्हणजे अगदी अति वरिष्ठापासून पोलिस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्यांना प्रचंड उशिर झाला. पुण्यात तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळातच 1200 हून अधिक कर्मचार्‍यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली होती. दरम्यान, तत्कालीन आयुक्तांची बदली झाली आणि पुण्यात आयुक्त म्हणून अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतरच्या दुसर्‍याच दिवशी अनेक कर्मचार्‍यांनी पोलिस आयुक्तांकडे अन्याय झाल्याबाबत साकडं घातलं आणि बदली विनाकारण करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर कर्मचार्‍यांचे ‘वॉर’ चालू करण्यात आले. मात्र, हे होत असतानाच आता अचानकपणे प्रशासकीय बदल्यांचे ‘महेश’पर्व सूरू असल्याची पोलिस वर्तूळामध्ये चर्चा आहे. आर्मीमध्ये कर्तव्य बजावून निवृत्त झाल्यानंतर पोलिस दलात दाखल झालेल्या एका पोलिस कर्मचार्‍याला प्रशासकीय बदल्यांचा चांगलाच फटका बसला आहे. त्याच्यासह इतर काही कर्मचार्‍यांच्या देखील प्रशासकीय बदल्या झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासकीय बदल्या करण्याचा पुर्ण अधिकारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना आहे. मात्र, पुण्यात सध्या चालू असलेल्या कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या वेगळयाच कारणामुळं होताहेत अशी ‘खमंग’ चर्चा पोलिस वर्तुळामध्ये आहे. बदल्यावरून खुपच चर्चा होत असल्याने दि. 15 ऑक्टोबरपासून कुठल्याही पोलिस कर्मचार्‍याच्या बदलीबाबतचा आदेश ‘गॅझेट’ला दिला जात नसल्याचं काही कर्मचारी सांगतात. विनंती तसेच प्रशासकीय बदल्या झालेल्या कर्मचार्‍यांना थेट बोलावून घेवून ऑर्डर हातात दिली जात आहे. अशीच एक ऑर्डर दि. 20 ऑक्टोबर रोजी काढण्यात आली आहे. त्यामध्ये आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदली झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचा बक्कल नं. 10588 आहे. पोलिस दलामध्ये दाखल होण्यापुर्वी तो कर्मचारी लष्करी सेवेत होता. अनेक वर्ष देशसेवा करताना त्या कर्मचार्‍यानं संगणकीय ज्ञान आत्मसात केलं तसेच इन्टेलिजन्सचं (कॉम्प्युटर) देखील काम समजून घेतलं. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत नेमणुक झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करून तो कर्मचारी ‘क्लिष्ट’ गुन्हयांची उकल करू लागला. मात्र, ‘चिरीमिरी’ तसेच ‘मलिदा’ घेऊन तपास करणार्‍या काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ‘पोटदुखी’चा त्रास सुरू झाला आणि अचानकपणे काही कारण नसताना संबंधित कर्मचार्‍याची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली. अशाच पध्दतीनं अनेक पोलिस कर्मचार्‍यांना प्रशासकीय बदली दाखवत कर्तव्य बजावित असलेल्या ठिकाणावरून ‘कमी’ करण्यात आलं आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय बदल्यांबाबत पोलिस कर्मचार्‍यांच्या मनात प्रचंड ‘खदखद’ असल्याची चर्चा पोलिस वर्तूळामध्ये आहे. काहीजण अति वरिष्ठांना चुकीची माहिती देत असल्याची देखील चर्चा सध्या पोलिस दलामध्ये आहे. एवढेच नव्हे चहापाणी दिल्याचे दीड डझनहून जास्त ‘रिवॉर्ड’ घेणारा ‘महेश’भक्त हा सध्या कर्मचारी अन् अधिकार्‍यांबाबत सखोल माहिती असल्याचा आव आणत पुण्यात नवीन अति वरिष्ठ आल्यानंतर स्वतःचं ‘रूपडं’ बदलून ‘वाघ’मारल्याच्या आवेशानं संबंधितांपर्यत गोडवे गायण्यासाठी ‘दक्षिणा’ देखील घेत असल्याची चर्चा पोलिस वर्तूळामध्ये सध्या आहे. सध्या सुरू असलेल्या एकंदरीत ‘महेश’पर्वाबाबत कोणी उघड चर्चा करत नसले तर स्वतःचं ‘रूपडं’ बदलून ‘पुनश्च हरिओम’ करणार्‍याचं मात्र बक्कळ ‘दक्षिणा’ मिळत असल्यानं फावलं आहे. वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती पुरवण्यात आल्यानं अनेक कर्मचार्‍यांमध्ये धुसफूस देखील झाली. मात्र, कर्मचार्‍यांना चुकीची माहिती पुरविणार्‍याचे खरे ‘रूप’ समजल्यानंतर त्यांच्यामधील बरेच गैरसमज दूर झाले आहेत. राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आगामी काही दिवसांमध्ये होणार आहेत. त्यानंतर आयुक्तालयात अंतर्गत बदल्या होतील अन् तेव्हाच ‘रूपडं’ बदलून चुकीची माहिती पुरविणार्‍याचं खरं रूप समजेल अशी पोलिस दलामध्ये चर्चा आहे. सध्या अनेक पोलीस अधिकारी ‘महेश’भक्त बनण्यास ‘उत्सुक’ असून दर्शन घेण्यासाठी मार्ग शोधत आहेत. काही अधिकारी तर मोठा ‘पर्वत’ उचलण्याची तयारी देखील दर्शवित असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.