Pune : गुंजवणी धरण झाले ओव्हरफ्लो, नीरा खोर्‍यातील चारही धरणे भरली

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा देवघर धरणा पाठोपाठ मंगळवारी ( दि.२५) गुंजवणी धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. या हंगामात नीरा खो-यातील चारही धरणे फुल्लं झाल्याने पुढील वर्षापर्यंत पुणे, सातारा, सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

गुंजवणी धरणाचे स्थान हे पुणे जिल्ह्या मधील वेल्हे तालुक्यातील धानेप येथील कानंदी नदीवर आहे.धरणाची पाणी साठवण क्षमता ३.६९ टि.एम.सी. इतकी असून धरणाला दोन वक्र दरवाजे आहेत. धरणाच्या मुख्य बंद वितरण नलिकेचे व उपसा जलसिंचन योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर वेल्हे, भोर व पुरंदर तालुक्यातील २१ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

गुंजवणी धरणात मंगळवारी (दि.२५) ३.६९ टि.एम.सी.पाणी साठा उपलब्ध झाला असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून २०० क्युसेक्स पाणी वीर धरणात येत आहे.

भाटघर, नीरा देवघर धरण परिसरात मंगळवारी दिवसभरात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे नीरा देवघर धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ७५० क्युसेक्स, भाटघर धरणातून संध्याकाळी सात वाजता पाच मानव निर्मिती दरवाजातून ३ हजार ५०० क्युसेक्सने तसेच गुंजवणी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याने ते पाणी पुढे वीर धरणात आले. त्यामुळे मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी सात वाजता वीर धरणाच्या विसर्गामध्ये कपात करून नीरा नदीत १३ हजार ९११ व वीज निर्मिती केंद्रातून ८०० क्यूसेक्स असा १४ हजार ७११ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू होता.