Pune News : जिल्ह्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या ‘व्हॉट्सॲप’ पोस्टने खळबळ, स्क्रिन शॉट व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून निधी गोळा केला जात असल्याचा आरोप होत असताना, ‘तो नेता कोण आहे’ आणि ‘तो कोणाचा पंटर आहे’ अशी पोस्ट जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला. या नेत्याच्या पोस्टने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या नेत्याला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने ही पोस्ट काही वेळातच डिलीट केली. मात्र, तोपर्यंत काही ‘सजग’ मंडळींनी त्या पोस्टचे ‘स्क्रीन शॉट’ काढले आणि व्हायरल केले. सध्या हा स्क्रीन शॉट प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या स्क्रीन शॉटमुळे नव्या विषयाला तोंड फुटले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विविध पक्षांकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेनेची देखील नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी ज्या वरिष्ठ नेत्याकडे आहे, त्या नेत्यासमोर कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जात आहे. आम्ही निवडणुकीची तयारी करायची नाही असा संतप्त सवाल यावेळी काही जणांनी विचारला. तसेच निवडणुकीची तयारी कशी करायची असे अनेक प्रश्न यावेळी मांडण्यात आले.

वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत काही इच्छुकांनी निधी गोळा करण्यात आल्याची बाबत बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितली. इच्छुकांनी निधी गोळा केला जात असल्याची बाब मांडल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याची चर्चा सुरु झाली. त्यावेळी एकाने हा नेता कोण अशी विचारणा केली. त्यावर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्याने त्या नेत्याचे नाव ग्रुपवर टाकले. नेत्याने नाव टाकताना ‘तो अन्य एका फायरब्रँड वरिष्ठ नेत्याचा पंटर’ असल्याची पोस्ट केली. आपली चूक लक्षात येताच त्याने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, काही कार्यकर्त्यांनी या पोस्टचा स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल केला. सध्या हा स्क्रीन शॉट प्रचंड प्रमाणात व्हायलर होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या स्कीन शॉटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.