पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरचा पत्नीकडून शारीरिक व मानसिक छळ, पत्नी-मेव्हण्यासह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील प्रसिद्ध डॉक्टर पतीचा संपत्तीसाठी पत्नीनेच संगणमताने मानसिक आणि शारिरीक छळ करून घरातील 40 लाखांचे दागिने, 25 लाखांची रोकड आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले किंमती ऐवज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीला मारहाणही करण्यात आली आहे.

याप्रकरणी पत्नी उज्वला ईश्वरचंद चिल्लाळ, मेव्हणा गजानन बाबुराव पारखे आणि अनिल बंडोपंत चिल्लाळ यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात भादवी कलम 406, 420, 379, 380, 323, 342, 504, 506, 1 तसेच 420 ब व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 68 वर्षीय डॉ. ईश्वरचंद चिल्लाळ गुरूवार पेठेत राहण्यास आहेत. त्यांना दोन मुली असून, त्याही डॉक्टर आहेत. ईश्वरचंद हे जुने आर्वेदिक डॉक्टर आहेत. घराच्या खालच्या मजल्यावर त्यांचा दवाखाना आहे. पती-पत्नी व मुलींसोबत ते राहतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नी एकमेकांना बोलत नाहीत.

दरम्यान, त्यांनी तिघांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यात संगणमताने दुष्ट बुद्धीने कट रचून वैयक्तीक लाभापोटी फिर्यादींची जंगम व स्थावर मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी तिघांनी फिर्यादींचा मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच, त्यांच्या कपाटामधील 40 लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने काढून घेतले. तसेच, 25 लाख रुपयेही चोरून नेले. तर, फिर्यादींचा कोणाशीही संपर्क होऊ नये यामुळे त्यांचे 4 मोबाईलची विल्हेवाटही आरोपींनी लावली. त्यानंतर एका बँकेत ठेवलेले लॉकरमधील किंमती ऐवजही काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादींना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, न्यायालयाने सुनावणी करताना 156/3 नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश खडक पोलीसांना दिले आहेत. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –