‘सत्संगा’वरून पत्नीला बेदम मारहाण, पतीसह सासू-सासर्‍यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड परिसरात एका उच्चभ्रु घरात सत्संगाला येण्यास नकार दिल्यावरून पत्नीला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, पगाराचे पैसे घरी देत नसल्यावरून तिचा छळ केला आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय उच्चशिक्षीत महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती प्रतीक बारटक्के, सासू-सासरे आणि दिर रोहन बारटक्के यांच्यावर विवाहितेचा कौटुंबिक छळ तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे एमबीएचे शिक्षण झाले असून, ती एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. तर, आरोपी पती प्रतीक याचे एमसीएचे शिक्षण झाले आहे. तोही एका कंपनीत नोकरीस आहे. त्यांचा अकरा महिन्यांपुर्वीच विवाह झाला आहे.

दरम्यान, बारटक्के कुटूंबीय देवदर्शन करत असते. तसेच ते सत्संगलाही जातात. पण, फिर्यादींना सत्संग वगैरे आवडत नाही. आरोपींनी त्यांना सत्संगाला येण्यासाठी हट्ट केला. परंतु त्यांनी सत्संगला येण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर पती प्रतिक याने नोकरी करतेस, मात्र पगाराचे पैसे देत नाही, असे म्हणत वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यानंतर बारटक्के कुटूंबियांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.