हडपसरमधील डॉ. झांजुर्णे पती-पत्नी ठरले आयर्नमॅनचे मानकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षी 2020 मध्ये दुबईमध्ये झालेल्या आयर्नमॅन-703 स्पर्धेत डॉ. राहुल झांजुर्णे आयर्नमॅन ठरले आणि 2021 मध्ये त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता झांजुर्णे यांनीही आयर्नमॅनचा मान पटकवला आहे. डॉ. झांजुर्णे 2020 साली आयर्नमॅन झाले, त्याचेळी डॉ. स्मिता यांनी आयुर्नमॅन होण्याची मनाशी खूणगाठ बांधली. त्याप्रमाणे मागिल वर्षभर तयारी केली आणि जानेवारी महिन्यात स्वीमिंगसाठी कोचिंग सुरू केले. असाध्य ते साध्य करिसी सायास, त्यासी तुका म्हणे अभ्यास या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती डॉ. स्मिता झांजुर्णे यांच्याबाबतीत दिसून येत आहे.

डॉ. स्मिता झांजुर्णे म्हणाल्या की, दुबईलाच पहिली आयर्नमॅन-703 करायचा योग येईल असे वाटले नव्हते. कारण स्वीमिंगबाबत मनामध्ये भीती होती. मात्र, ट्रेनिंग सुरू केले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला. स्वीमिंग पूल बंद झाल्यामुळे ट्रेनिंगचा खेळखंडोबाच झाला. त्यामुळे आयर्नमॅन-703 होण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. घरातच कोरोना पॉझिटिव्ह पेशंट निघाला. “सहकार्य” हीच मोठी मदत होती! मुलांना सांभाळणे, घरच्या काही मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी ते कायमच अग्रेसर राहिले. वयाच्या चाळिशीत दोन शिकणारी मुले असताना, स्वतःचं डेंटल क्लिनिक असताना आयर्नमॅनसारख्या गोष्टी करायची काय गरज आहे ? असा प्रश्न मनाला शिवला नाही. दररोज नियमित पहाटे चार वाजता उठून पाच सव्वापाचला पाण्यात बुडिमाराण आणि आल्यावर परत रनिंग आणि सायकलिंग करण्यात दिवस भुर्रकन जात होते. इव्हेंट जवळ येत होता तस-तशी उत्कंठा वाढतच होती. दुसऱ्या देशात जाऊन एखादी रेस करणे ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच!!

आयर्नमॅन दशरथ जाधव, डीपी सर, झेड प्लस सर यांच्यासारखे अनुभवी सहकारी सोबत असल्यामुळे रेसचा स्ट्रेस पूर्णपणे कमी झाला. 12 मार्च 20121 सरतेशेवटी रेस डे उगवला आणि मी माझी जिद्द पणाला लावली. उसळत्या लाटा, समुद्राचं खारं पाणी आणि परत फिरल्यावर डोळ्यात घुसणारी तापलेली सूर्य किरणे यांच्यावर मात करून 58 मिनिटांत म्हणजेच बारा मिनिटे राखून स्विमिंग पूर्ण केले. मनातल्या मनात माझे स्विमिंग कोच शुभंकर सरांना मी अभिवादन केलं आणि ट्रानशेन झोनमध्ये उडी मारली. अनपेक्षित गोष्टींनी माझी ही रेस खचाखच भरली होती. माझ्या सायकलींगचे सामान ठेवलेली ट्रान्झिशन बॅग कुणीतरी उचलून नेली होती. (ज्या बॅगशिवाय तुम्ही सायकलिंगला जाऊच शकत नाही अशी बॅग) त्यामुळे पहिल्या आयन मॅनचे स्वप्न भंग पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

तिथेच मॉरल डाऊन झाले. जवळपास लाखमोलाची सहा मिनिटे गेली. त्यात युरोपमधल्या दोन स्पर्धक देवासारख्या धावून आल्या आणि स्वतःची रेस सोडून माझी बॅग शोधण्यास मदत करून कंप्लेंट केल्यावर दोन मिनिटांत माझी बॅग त्यांनी शोधून दिली. आयर्नमॅनमध्ये एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यात सहा मिनिट गेल्यावर जरा दुखावलेल्या मनाने सायकलवर स्वार झाले. प्रचंड हेड वींड म्हणजे उलटे वारे आणि वाळवंटातील 39 अंश सेल्सिअस तापमानात (केळी,चिक्की)च्या कमतरतेने माझी चांगलीच फिरकी घेतली. शेवटचा इनिंग लेग मला सारखा खुणावत होता. 90 किमी सायकलिंग संपवत रनिंगचे शूज घालून 21 किलोमीटर धावण्याची मानसिक तयारी मी केली.

बर्फाचे गोळे दर एक दोन किलोमीटरला अंगावर टाकून पळाले. कुठून हे आयर्नमॅनचं “फॅड” डोक्यात आलं असा विचारही डोकावून गेला. काहीही करून स्ट्रॉंग फिनिश करणे हेच ध्येय ठेवले होते. “स्मिता 30 मिनिट तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत “….असं ते ओरडून सांगत होते. त्यानंतर धावतच सुटले. त्यांनी भारताचा झेंडा दिला आणि डोळ्यासमोर खुणावणारी फिनिश लाईन दिसली. आमच्या साऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि मी “आयन मॅन” झाले. माझ्या नवऱ्याने (आयर्नमॅन डॉ. राहुल झांजुर्णे) माझ्यासमोर जे आव्हान ठेवले होते ते मी पूर्ण केलं! आम्ही दोघेही दुबईला जाऊन झांजुर्णेंचा झेंडा रोवून आलो, ही बाब आम्हा भारतीयांसाठी खूप अभिमानस्पद आहे.