Pune : रुग्णसेवा आणि मदतीसाठी धावणारा एक ‘अवलिया’ डॉ. शंतनू जगदाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी बेड मिळविण्यात अनेक अडचणी येत आहेत. रक्त, प्लाझमा, रुग्णवाहिका मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोरानाने सैरभैर झालेली मंडळी आता डॉक्टरांबरोबर आपल्या ओळखीच्या मंडळींचा आधार घेऊ लागली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रामुख्याने अनेक डॉक्टर मंडळी २४ बाय ७ सेवा देण्याचे व्रत हाती घेतले आहे. रुग्णसेवा आणि मदतीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यातीलच एक अवलिया डॉ. शंतनू जगदाळे

डॉ. जगदाळे यांची रुग्णसेवा मागिल अनेक वर्षांपासून हडपसरमधील अनेकांना परिचित आहे. रात्री-अपरात्री फोन केल्यानंतर तातडीने उपचारासाठी धावून जात उपचार करण्याची त्यांची पद्धत अनेकांनी अवलंबिली आहे. त्याचबरोबर चांगला सल्ला आणि पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे ही त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सुरुवातीला गोंधळेनगर येथे छोटेखानी क्लीनिक आणि नंतर मंतरवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे क्लीनिक सुरू करून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. औषधोपचाराबरोबर अनेक नागरिक त्यांच्या शाळा-महाविद्यालयीन प्रवेशासाठीसुद्धा जातात. त्यांनाही योग्य मार्गदर्शन देऊन अडीअडचणी सोडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया मंतरवाडी परिसरातील कामगार-कष्टकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. मागिल वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्यावेळी औषधोपचार आणि अन्नधान्यरूपी मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आजही त्यांची रुग्णसेवा अविरत सुरू आहे.

मागिल दोन वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र, मागिल दोन महिन्यांपासून कोरोनाचा ज्वर वाढल्यामुळे सामान्यांना उपचार मिळविण्यासाठी कमालीची धडपड करावी लागत आहे. कोरोना चाचणी, उपचारासाठी बेड, ऑक्सीजन, रुग्णवाहिका, रक्त अशा एक ना अनेक बाबींसाठी सामान्य नागरिकांकडून डॉक्टरांना रात्री अपरात्री फोन करून विनंती करावी लागत आहे. पुण्याच्या पूर्व भागातील सर्वच खासगी रुग्णालयांमधील बेडच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे बेड मिळविण्यासाठी खासगी रुग्णालयांची मनधरणी करावी लागत आहे. मागिल दोन वर्षांपूर्वी खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण मिळविण्यासाठी मार्केटिंगचे अनेक वेगवेगळे फंडे वापरले जात होते. आता मात्र रुग्णांना बेड मिळविण्यासाठी अनेकांचे पाय धरण्याची वेळ आली आहे, ही बाब निश्चित लाजीरवाणी आहे. कोरोना व्यतिरिक्त आजारी व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉ. जगदाळे २४ बाय ७ सेवा बजावत आहेत.

शिक्षक, पोलीस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना बेड, टेस्टींग, आयोलेशनची, प्लाझमा, रक्त, उपचारासाठी तातडीची व्यवस्था करण्यासाठी दिवस-रात्र फोनवर मदतीसाठी कार्यरत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे, रयत शिक्षण संस्थेच्या चं.बा. तुपे साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्य कालेकर यांनी डॉ. जगदाळे यांच्या कार्याविषयीच्या अनुभवाची माहिती दिली.