डीएसकेंच्या जप्त केलेली मालमत्ता आणि वाहनांमधून 5 लाखाचा ऐवज चोरीस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या जप्त केलेल्या मालमत्ता आणि वाहनांमधून चोरटे किमती ऐवज चोरून नेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2017 ते 2020 या कालावधीत 5 लाखाहून अधिक माल चोरीला गेला आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे राहुल शितोळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. या गुन्ह्याचा आलेखनंतर वाढतच गेला. याप्रकरणी पोलिसांनी दिकप कुलकर्णी, पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष यांच्यासह 11 जणांना अटक केली. सध्या त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात आहे. दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील तबल 463 मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. सध्या न्यायालयात या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्ता आणि वाहने सील करण्यात आली आहेत. मात्र चोरट्यांनी याच मालमत्ता आणि वाहनांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी फुरसुंगी भागातील डीएसके यांची ग्लोबल एज्युकेशन व वॉटरफॉल रेसिडेन्सी हा बहुमजली प्रकल्प आहे. हा प्रकल्प देखील सील करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार आणि सहायक निरीक्षक सुनील गवळी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्यावेळी या प्रकल्पात तीन इमारतीत 6 मजले आहेत. तसेच 1000 हजार खोल्या आहेत. त्यावेळी या दरवाजांचे व खिडकी यांच्या काचा फोडण्यात आल्याचे दिसून आले. तसेच चोरट्यांनी एसी, पंखे, टीव्ही, बेड, कपाट, सीसीटीव्ही, संगणक, मॉनिटर तसेच कँटीनमधील फ्रीज, टेबल गॅस, कुलर असा 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्यानुसार याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडे देण्यात आला आहे. त्यानुसार या चोरट्यांचा माग काढण्यात आला आहे.