Pune : ‘अभय योजने’मुळे पालिकेला मिळाले 27 दिवसांत 100 कोटी 54 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना साथीमुळे महापालिकेचा खर्च वाढला असून उत्पन्न मात्र थंडावले आहे. या परिस्थितीवर मात करुन उत्पन्न वाढविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली. महापालिकेच्या या योजनेअंतर्गत ५० लाख रुपयापर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी एकूण दंडाच्या रकमेत ८० टक्के सूट जाहीर करण्यात आली. त्यामुळे करवसुली वाढली आणि योजनेच्या पहिल्या २७ दिवसात महापालिकेच्या तिजोरीत १०० कोटी ५४ लाख रुपये जमा झाले अशी माहिती रासने यांनी दिली.

पुणे महापालिकेकडून दिनांक ०२ ऑक्टोबर पासून ही योजना राबविली जात आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. २७ दिवसात ४२ हजार १०० करदात्यांकडून १०० कोटी ५४ लाख रुपये महापालिकेकडे जमा झाले आणि पालिकेवरील आर्थिक ताण काही प्रमाणात हलका झाला. चालू आर्थिक वर्षात मिळकतकराद्वारे ९५० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले असल्याचे रासने यांनी सांगितले.