Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान पुण्यातील गरजुंना ‘अन्नदान’, गणेश भुतडा यांचा सुत्य उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. देशात देखील याचा शिरकाव झाला असून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशामध्ये लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेकजण पुण्यामध्ये अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे गरीबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. गरीब आणि रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी पुण्यातील गणेश भुतडा यांनी मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे.

गणेश भुतडा आणि त्यांचे 10 मित्र दररोज ससून, साधू वासवानी चौक, शिवाजीनगर, नदीपात्र, जेएम रोड, मालधक्का चौक, शनिवार वाडा या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मोफत जेवणाचे पॅकेट वाटत आहेत. दररोज सकाळी 2 हजार आणि रात्री 2 हजार लोकांना जेवणाचे पॅकेट्स वाटण्यात येत आहे. पोळी तयार करण्यासाठी आचारी मिळत नसल्याने भुतडा आणि त्यांच्या मित्रांनी समाजाच्या मंदिरामध्ये पुरी-भाजी तयार करून त्याचे पॅकेट तयार करतात. हे पॅकेट गरीब आणि गरजवंताला सकाळ संध्याकाळी वाटप केले जाते.

याबाबत सांगताना गणेश भुतडा यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी फक्त दीडशे जेवणाचे पॅकेट वाटण्यात आले. दुसऱ्या दिवशी याची संख्या वाढवून दोन हजार करण्यात आली. शहरातील मुख्य ठिकाणी असलेले गरीब आणि गरजवंतांना जेवणाचे पॅकेट देण्यात येतात. यासाठी 10 मित्रांची मदत होत असून प्रत्येकजण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन जेवणाचे पॅकेट वाटत आहेत. सध्या हे पॅकेट कमी पडत असून लवकरच याची संख्या वाढवण्यात येणार आहे.

या अनुभवाबाबत सांगताना गणेश भुतडा म्हणाले, शहरातील अनेक लोकांना जेवण मिळणे कठीण झाले आहे. हजारो लोक रस्त्यावर आहेत. काही फिरस्ते आहेत तर काहींना आपल्या गावी जाता आले नसल्याने ते पुण्यात अडकून पडले आहे. पुणे शहरात रस्त्यावर राहणाऱ्यां गरीब लोकांना ज्यावेळी आम्ही जेवणाचे पॅकेट देतो त्यावेळी त्यांना भूक असेल तरच ते घेतात. एका ठिकाणी तर काही लोकांनी आमचे पोट भरले आहे, रात्रीचे जेवण आहे असे सांगून जेवणाचे पॅकेट गरजूला द्या असे सांगितले. त्यांच्या या उत्तराने जोमाने काम करण्याची ताकद मिळाल्याचे भुतडा यांनी सांगितले.