Pune : पुण्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांकडून E-Pass पास सेवा सुरू; अत्यावश्यक सेवेतील लोकांना पुणे शहरात फिरताना ई-पासची गरज नाही पण…; जाणून घ्या कोणा-कोणाला मिळू शकतो E-Pass

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आल्यानंतर पुण्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी पुणे पोलिसांनी डिजिटल (E-Pass) पास सेवा सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे. आतापर्यंत 2 हजार अर्ज आले आहेत. त्यातील पावणे तीनशे नागरिकांना पास देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर आयुक्त अशोक मोराळे यांनी कक्षाची पाहणी केली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा बंदी केली आहे.अत्यावश्यक असेल तरच तुम्हाला जिल्हा सोडता येणार आहे. तर त्यासाठी पोलिसांकडून पास घेणे आवश्यक आहे. त्यात तुम्हाला कोणत्या कामासाठी जायचे आहे, हे नमूद करावे लागणार आहे. योग्य कारण असेल तरच तुम्हाला पोलीस पास देणार आहेत. त्यानुसार आज पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. covid19.mhpolice.in या वेबसाईटवर नागरिकांनी अर्ज करायचा आहे. त्यांना तात्काळ पास दिले जाणार आहेत. पुणे पोलिसांनी कक्ष सुरू केल्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 हजार 77 अर्ज आले आहेत. त्यातील 288 जणांना पास देण्यात आले आहेत तर 375 जणांनी आवश्यक कागदपत्रे न दिल्याने त्यांचे अर्ज नाकारले आहेत. एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 20 कर्मचारी असणार आहेत. नागरिकांनी आवश्यक असल्यासच घरा बाहेर पडावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पास बाबत महत्वाची सूचना –

* अत्यावश्यक सेवामधील नागरिकांना शहरात फिरताना ‘या’ पासची आवश्यकता नसणार आहे. पण, त्यांनी त्यांचे ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अडवल्यास ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे.

* जवळचे नातेवाईकांच्या गंभीर आजारासाठी किंवा मृत्यू झाला असेल आणि त्यांना पुण्यातून बाहेर जायचे असेल तर त्यांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे गरजेचे आहे.

* अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र जवळ बाळगावे.

* तसेच लग्न समारंभ असल्यास मामा, आईवडील, भाऊ, बहीण, माउशी, काका, आत्या यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी अर्जासोबत पत्रिका जोडणे आवश्यक आहे.

* तसेच व्यावसायिक (प्रोफेशनल) काम असल्यास त्यांना परावनगी नसेल.

* विमान प्रवास करणार्‍यांना पास दिले जाणार आहेत.