Pune News : थाळी खा अन् बुलेट जिंका ! ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलचा नवा फंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना संसर्गाचा मोठा फटका हॉटेल उद्योगाला बसला आहे. लॉकडाऊन नंतर आता कुठे हॉटेल्स सुरु झाली असली तरी हा उद्योग अद्यापही पूर्ण बहरला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ग्राहकांची पावले पुन्हा वळावी यासाठी हॉटेल मालकांनी वेगवेगळ्या योजना सध्या सुरु केल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशीच एक योजना पुणे जिल्ह्यातील मावळ ताुलक्यातील शिवराज हॉटेलने सुरु केली आहे. थाळी खा अन् बुलेट जिंका अशी योजना हॉटेलच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.

तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र असलेली बुलेट जिंकण्यासाठी तुम्हाला या हॉटेलची नॉन व्हेज थाळी 60 मिनिटामध्ये संपवणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण केलेल्या ग्राहकांना 1 लाख 65 हजारांची रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfield Bullet) बक्षिस दिली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ भागात हे हॉटेल असून ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरु केल्याची माहिती हॉटेलचे मालक अतुल वायकर यांनी दिल्याचे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.

काय, काय असणार थाळीत ?

थाळी खा अन् बुलेट जिंका’ स्पर्धेसाठी तयार केलेल्या स्पर्धेतील नॉन व्हेज थाळीमध्ये एकूण 12 प्रकारचे पदार्थ आहेत. यामध्ये फ्राईड सुरमई, चिकन तंदुरी, ड्राय मटन, ग्रे मटन, चिकन मसाला, कोंळबी, आणि प्रॉन बिर्याणी आदी पदार्थांचा समावेश आहे. या हॉटेलमधील एकूण 55 कर्मचाऱ्यांनी मिळून ही खास थाळी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वीही शिवराज हॉटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 60 मिनिटांमध्ये ‘रावण थाळी’ खाण्याची योजना जाहीर केली होती. 8 किलोची ही थाळी चार ग्राहकांनी एकत्रित 60 मिनिटांमध्ये संपवल्यास त्यांना 5 हजाराचे बक्षिस आणि शिवाय त्या थाळीचे बिल माफ अशी ती योजना होती.