Pune : असंघटितांनासुद्धा शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू – राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व घटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. संघटित रिक्षाचालक, घरेलू कामगार यांना मदत जाहीर केली आहे, ती त्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन त्यांना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर असंघटित कामगारांनासुद्धा शासकीय मदत देण्यासाठीचे प्रयोजन सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल आणि शहर साई वैभव रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा संघटना यांच्या वतीने रिक्षाचालकांचे शासकीय मदतीसाठीचे अर्ज भरून घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी नगरसेवक योगेश ससाणे, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विठ्ठल विचारे, माजी नगरसेवक सुनील बनकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, माजी स्वीकृत नगरसेवक संजयतात्या शिंदे, शीतल शिंदे, पवन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, राज्य परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेविषयी महाराष्ट्र् रिक्षा स्टँड, साई प्रतिष्ठान, काळेपडळ- रेल्वेगेटजवळ, साईवैभव रिक्षा संघटना, आस्था फाऊंडेशनच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. शासकीय योजनेतील अनुदान मिळविण्यासाठी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी अर्जप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.