Pune : ‘कोरोना’मुळे रखडलेल्या महापालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुका होण्याचा मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनामुळे रखडलेल्या महापालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने ऑनलाईन पद्धतीने या निवडणुका घेण्याची परवानगी दिली असून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येत्या महिना अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्यात टप्प्या टप्प्याने निर्बंध लादण्यात आले होते. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून महापालिकेच्या सभा आणि अन्य निवडणुकांनाही बसला आहे. विशेषतः पालिकेतील महिला बाल कल्याण, क्रिडा, शहर सुधारणा, विधी या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक रखडली आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वीच या समित्यांवरील सदस्यांची निवड झाली आहे. परंतु कोरोना मुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलल्याने त्याचा फटका या समित्यांवरील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांनाही बसला होता. त्यामुळे पूर्वीच्याच अध्यक्ष व उपाध्यक्षांकडे पदभार होता. हीच परिस्थिती प्रभाग समिती अध्यक्ष निवडीबाबत झाली होती .

दरम्यान या समित्यांवरील अध्यक्ष व उपाध्यक्ष हे समितीतील सदस्यांकडूनच निवडण्यात येतात. या पदांच्या निवडणुका न झाल्याने निर्णय घेण्यात ही अडचणी येत असून शासनाने निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी, असे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शासनाला पाठवले होते. राज्य शासनाने नुकतेच महापालिकेला या विषय समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली असून येत्या 30 तारखेपर्यंत ही निवडणूक होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.