Pune : वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी सोडविण्यावर भर – डॉ. शिरीष घुले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डॉक्टर सेलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. कोविड लस देण्यासंबंधी माहिती देऊन, औषधे घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे, असे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिरीष घुले यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मांजरी बु (ता. हवेली) येथे कोविड लस आणि औषधे कशा पद्धतीने घ्यावीत याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. शिरीष घुले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे आणि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. घुले म्हणाले की, कोविड लस घेण्यासाठीची नोंदणी कशी करावी, त्यानंतर औषधे कशी घ्यावीत. कोरोनावर आपल्याला मात करायची आहे, एकमेकाला मदत करण्याची ही वेळ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. शासनाच्या माध्यमातून ४५ वयाच्या पुढील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोविड लस प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.