Pune : शहरातील ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणांना फक्त नोटीसा, कारवाई अभावी महापूराची भिषणता कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील बहुतांश नाले आणि ओढ्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश अतिक्रमण कात्रज ते राजेंद्रनगर दरम्यान वाहाणार्‍या आणि सर्वात मोठ्या आंबिल ओढ्यावर आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार ३० ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांना वारंवार नोटीस दिल्या आहेत, मात्र एखाद दुसर्‍या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून सर्व नाल्यांवरील अतिक्रमणांची परिस्थिती जैसे थेच असल्याने मुसळधार पावसात आंबिल ओढ्याला पूर येउन मोठ्याप्रमाणावर हानी होत असल्याचे समोर येत आहे.

आंबिल ओढ्यावर कात्रज येथील स.नं. ११ लेक टाउन सोसायटी,सुखसागर नगर येथील अतिक्रमणासाठी ४ बांधकामांना नोटीसेस देण्यात आल्या आहेत. कात्रज स्मशानभूमीतील नाल्या लगतच्या नवीन वसाहतीतील अतिक्रमणासाठी १४ नोटीसेस देण्यात आल्या आहेत. गुजरवाडीतील हॉटेल तिरंगा ढाबा ते सेरेटेक ग्रीन्स कात्रज मारूती सर्व्हिस सेंटर येथील सहा मिळकतींना नोटीसेस देण्यात आल्या आहेत. उत्कर्ष सोसायटी स.नं. ४५ निंबाळकरवाडी ते कलश ते उत्कर्ष सोसायटी येथील ५ मिळकतींना नोटीसेस देण्यात आल्या आहेत. कात्रज येथील राम मंदिर येथील ३० मिळकतींचे अतिक्रमण आहे. येथे १३ नोटीसेस देण्यात आल्या आहेत. अंजनीनगर, शहनाई हॉल येथे नाल्यावर अतिक्रमण करणार्‍या ६ मिळकतींना नोटीसेस देण्यात आल्या आहेत. सुखसागर नगर येथील स.नं. १४, १५, १६ आणि २० मधील चार मिळकतींना नोटीसेस देण्यात आल्या आहेत. कात्रज येथील जवाहर बेकरी परिसरातील ६ मिळकतींनी अतिक्रमण केले आहे. त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

कोंढवा बु. स.नं.३९,४०,३८, ४१,५४ या कोंढवा हॉस्पीटल व सिंहगड कॉलेज परिसरात नाल्यावर अतिक्रमण केलेल्या दोन मिळकतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. कोंढवा बुद्रुक स.नं. ४१, ४२, ३६, स्मशानभूमी ते कोंढवा बु.हद्द, येवलेवाडी स.नं.७,३७,१,३८,३९, ३६,२७,२८,२०,२१,२२,१४ व १८ मध्ये नाल्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी मिळकतधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

बिबवेवाडीतील पदमावती मंदिर ते ई.एस.आय हॉस्पीटल दरम्यान वाहाणार्‍या ओढयावर पूनम हाईटस्च्या मागील कल्व्हर्टवर बांधकाम केले असून सोसायटी या जागेचार वापर करत आहे. तसेच येथे पत्राशेडही बांधले आहे. पर्वती येथील गजानन महाराज मठाजवळ आंबिल ओढ्यालगत बांधण्यात आलेल्या पत्राशेडलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

या बहुतांश नोटीसेस मागीलवर्षी २५ सप्टेंबरला आलेल्या पूरस्थितीनंतर बजावण्यात आल्या आहेत. तर अरणेश्यवर मंदिर येथील यशोधरा सोसायटीलगत नाल्यामध्ये वॉशिंग सेंटरसाठी दगडी व कॉंक्रीट बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी २०१७ मध्ये दिवाणी दावा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याचा निकाल लागलेला नाही. तर कर्वेनगर येथील स.नं.४६ व स.नं.११ येथील नाल्यात उभारण्यात आलेले २०० चौ.मी. पत्राशेड तसेच ३०० चौ.मी. आरसीसी बांधकाम काढण्यात आले आहे. येवलेवाडी येथील स.नं.१०/४/१ व १०/२/४ व १२ मध्ये नाल्यावर अतिक्रमण करून सुरू असलेल्या बांधकामाला स्टॉपवर्क नोटीस बजावण्यात आली आहे.

हिंगणे खुर्द येथील जोशी वडेवाले यांच्या बंगल्याच्या शेजारील मिळकतीस जून २०१८ मध्ये नोटीस बजावून कारवाई करण्यात आली आहे. तर २०१७ मध्ये महंमदवाडी येथील नाल्याच्या कडेला असलेल्या झोपडया व पत्रा शेडवर कारवाई करून ४३०० चौ.फूट क्षेत्र रिकामेकरण्यात आले आहे. तसेच कोंढव्यातील स.नं. ४० पार्टमधील नाल्यातील दोन हजार चौ.फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.