लव्ह, सेक्स, धोका ; इंजिनिअर प्रियकराची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जग हे अतिशय वेगवान होत चालले आहे. त्याचा परिणाम माणसाने कोणत्याही गोष्टीत तत्परतेने निर्णय घेऊन काम करण्याचे दडपण वरिष्ठांकडून सातत्याने हाताखालील तरुणांवर टाकले जाते. कामाच्या ठिकाणी असलेले दडपण आणि तातडीने निर्णय घेऊन त्याची पूर्ती करण्याची लागलेली सवय हळूहळू ते आपल्या वैयक्तिक जीवनातही अंगीकारु लागतात.

त्याचा परिणाम नव्या पिढीवर होत असून ते मागचा पुढचा विचार न करता झटपट निर्णय घेऊन टाकू लागले आहेत. त्यात प्रेमभंगामुळे निराश झालेले तरुण तरुणी मृत्युला जवळ करु लागले आहेत. प्रेयसीने लग्नाचे दिलेले वचन न पाळल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाने पुण्यातील डेक्कनवरील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आदर्श सुरेंद्र चिकटे (वय २७, रा. मालेगाव बाजार, ता. तेलारा, जि. अकोला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदर्श याची आई लता चिकटे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील २६ वर्षाच्या तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आणि आदर्श अमरावती येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकम्युनिकेशन शाखेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांची ओळख होती. त्यांचे गेल्या ५ वर्षांपासून प्रेम संबंध होते. दरम्यान, तरुणी मुळची वाशिम जिल्ह्यातील असून, शिक्षणानंतर ती नोकरीनिमित्त पुण्यात राहण्यास आली तर, आदर्श हा गावीच होता. आता त्यांनी लग्न करण्याचे ठरविले होते. आदर्श अधून-मधून तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात येत असे. गेल्या महिन्यात तो पुण्यात आला होता. डेक्कन जिमखान्यावरील ऋतुगंध हॉटेलमध्ये तो उतरला होता. दरम्यान, या तरुणीचे मन बदलले व तिने आदर्शबरोबर लग्न करण्यास नकार दिला. लग्नापर्यंत सर्व काही ठरलेले असताना अचानक तिने दिलेला नकार आदर्श पचवू शकला नाही. २४ आॅक्टोंबरला तो हॉटेलच्या रुमवर परत आला. त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. डेक्कन पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली.

मुलाच्या मृत्युच्या धक्क्यातून बाहेर आल्याने त्याची आई लता चिकटे या पुण्यात आल्या. त्यांनी मुलाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद दिल्यावर डेक्कन पोलिसांनी या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदर्शने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे अधिक तपास करीत आहेत.