Pune : कोरोना बाधित मुलांवरील उपचारासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा व उपचारासाठी पुणे महापालिकेने बालतज्ज्ञांचा समावेश असलेली ‘टास्क फोर्स’ स्थापन केली आहे. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार लहान मुलांवरील उपचारासाठी टास्क फोर्सने केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

रुबल अग्रवाल यांनी सांगितले, की कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो कोव्हिड सेंटरमध्ये ५० बेडस्, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात २०० बेडस् आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हिड केअर सेंटरमध्ये २०० बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने शहरातील बालरोग तज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरातील लहान मुलांसाठीच्या खाजगी रुग्णालयांसोबत व तेथील डॉक्टर्ससोबतही समन्वय राखून कामकाज सुरू केले आहे. शहरातील बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेे आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार लहान मुलांवरील उपचार पद्धती, औषधे यांची उपलब्धता करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

जंबो रुग्णालयामध्ये मुलांवर उपचारासाठी ५ बेडस्चे आयसीयु सुरू करण्यात येणार आहे. आयसीयुसाठी येथील ५ व्हेंटीलेटर्सचे केवळ सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. यासोबतच तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार ऑक्सीजन मास्क व अन्य तांत्रिक बाबींची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजीव गांधी रुग्णालयातही १५ व्हेंटीलेटर्सची सुविधा करण्यात येत आहे. सीएसआरच्या माध्यमातून अथवा थेट खरेदी करुनही हे व्हेंटीलेटर्स तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही रुबल अग्रवाल यांनी नमूद केले.