Pune : भूमी अभिलेखचे तत्कालीन उपसंचालक बाळसाहेब वानखेडे यांची पुणे, मुंबई, अकोला अन् अमरावतीमध्ये ‘मालमत्ता’; वानखेडे पती-पत्नीविरूध्द अपसंपदा बाळगल्याप्रकरणी ACB कडून गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपसंचालक बाळासाहेब वानखेडे व पत्नी उषा वानखेडे (वय 54) यांच्याकडे 88 लाख 85 हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आता त्यांच्यावर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची उघड चौकशी सुरू होती. त्यांच्या पुणे व इतर ठिकाणच्या घरांची झडती घेतली जात आहे.

याप्रकरणी आज पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बाळासाहेब वानखेडे (वय 58) आणि पत्नी उषा बाळासाहेब वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब वानखेडे हे सध्या सेवानिवृत्त आहेत. ते भूमी अभिलेख कार्यालयात उपसंचालक होते. तीन वर्षांपूर्वी जमिनीच्या वादात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी एका वकिलामार्फत 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बाळासाहेब वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीकडून त्यांची उघड चौकशी सुरू होती. त्यानुसार त्यांच्याकडे व पत्नीकडे 88 लाख 85 हजार 587 रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यानुसार चौकशीअंती आज एसीबीने वानखेडे दाम्पत्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्या पुणे, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यात मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. एसीबीने त्यांच्या घरांची व इतर ठिकाणांची झडती सुरू केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.