Pune : माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी खासदार, सहकारतज्ञ संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. ते बारामती तालुक्यातील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. लाला या नावाने ते कार्यकर्त्यामध्ये लोकप्रिय होते.

बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. जनता दलाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले होते.
बारामती तालुक्यातील काकडे घराणे हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक मातब्बर घराणे मानले जाते. संभाजीराव काकडे हे १९७१ मध्ये प्रथम विधान परिषदेवर आमदार झाले. १९७८ आणि १९८२ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जात असत.