सख्ख्या मेव्हण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे, पत्नी उषा काकडे यांना अटक, न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण, काकडे म्हणाले – ‘हा तर कौटुंबिक वाद, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सख्ख्या मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नीला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटककरून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांनी हा तर कौटुंबिक वाद असल्याची प्रतिक्रिया कळवली आहे.

याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात खासदार संजय काकडे त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) फिर्याद दिली होती.

युवराज ढमाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागीदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दरम्यान, आज चतुःश्रुंगी पोलिसांनी संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे हे न्यायालयात आले असता त्यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. अटकेची कारवाई करताच त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर आज न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. यावेळी दोघांना अटककरून चार्जशीट सोबत न्यायालयात हजर केले होते, असे वरिष्ठ निरीक्षक शेवाळे यांनी सांगितले.

हा तर कौटुंबिक वाद

‘हा कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं व पत्नीचं साधं बोलणं देखील झालेलं नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत.’

– संजय काकडे, माजी खासदार