Pune : Ex MP काकडे यांना जामीन; जाणून घ्या न्यायालयात नेमकं काय झालं ? बचाव पक्षाचे वकील म्हणाले – ‘काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारच्या ताफ्यासह रॅली काढल्याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेले माजी खासदार संजय काकडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणात आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. तहसीलदार यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मारणे याने १५ फेब्रुवारी रोजी तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत अनेक कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. याबाबत विशेष शाखेच्या सोशल मीडिया सेलचे पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात चौकशीसाठी काकडे यांना यापूर्वीही गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. बुधवारी अखेर त्यांना अटक करण्यात आली.
मारणे आणि काकडे यांच्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहेत. मारणे रॅली प्रकरणात दाखल गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्यावर काकडे दबाव आणण्याची शक्यता आहे. तसेच ते साक्षीदार यांना प्रलोभन दाखवून धमकीही देऊ शकतात. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

यासाठी केली होती अटक –

मारणे कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा कट कोणी रचला ?, कट कोणत्या ठिकाणी रचला गेला ? या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे ? या गुन्हाचा कट रचण्यामागे अटक आरोपींचा नक्की काय उद्देश आहे ? याबाबत काकडे यांच्याकडे तपास करायचा आहे. तसेच अटक आरोपींनी सोशल मिडीयावर दहशत पसरविण्यासाठी कोणकोणत्या साथीदारांची मदत घेतली ? त्यांचा गुन्ह्याशी काय संबंध आहे ? याबाबत तपास करण्यासाठी काकडे यांना पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. पी. सातव यांनी केली होती.

काकडे यांच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे नाहीत :

काकडे यांच्या विरोधातील कोणता पुरावा पोलिसांकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता त्यांना अटक करण्यात आली आहे. काकडे हे माजी खासदार असून राजकीय उद्देशातून त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही. तसेच काकडे यांचा या गुन्ह्यात काय सहभाग आहे, हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन देण्यात यावा, असा बचाव काकडे यांचे वकील चिन्मय इमानदार आणि ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला.