Pune : लॉकडाऊन काळातील हप्ता प्रकरण : उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्‍यास लाच घेताना देशी दारूच्या दुकानात रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यास 7 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई वानवडी परिसरात झाली आहे.

आनंदा काजळे असे पकडण्यात आलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजळे हे वानवडी विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहेत. यादरम्यान लॉकडाऊन काळातला हप्ता न दिल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना हप्ता देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. यावेळी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज वानवडी भागातील एका देशी दारूच्या दुकानात 7 हजार रुपयांची लाच घेताना काजळे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.