Pune : पुढील 48 तासांत निर्णय घ्या, अन्यथा दुकानं उघडणार ! शहर भाजपा व्यापारी आघाडीने सरकारला दिला अल्टीमेटम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने महाराष्ट्र सरकार व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने लादलेल्या नियमांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. येत्या 48 तासांत सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या नावाखाली दुकाने व संपूर्ण व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास भाजपा व्यापारी आघाडीचे सदस्य व्यापारी दुकाने उघडतील, असा इशारा पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास आणि प्रसिद्धी प्रमुख संजीव फडतरे यांनी दिला आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज बिबवेवाडी मध्ये प्रतिकात्मकरित्या दुकान उघडून त्यास प्रारंभ केला आहे. आता सरकार व स्थानिक प्रशासनाने हा विषय गांभिर्याने घ्यावा. व्यापाऱ्यांमधील संयम संपत चालला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ यावर निर्णय घ्यावा. व्यापारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन व्यापार करेल, असेही महेंद्र व्यास आणि संजीव फडतरे म्हणाले.

सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याने व्यापारी अडचणीत सापडला आहे. कोरोनाला रोखायचे म्हणजे व्यापाऱ्याला उध्वस्त करायचे असे होत नाही. आपली अर्थव्यवस्था टिकली तरच सर्व टिकेल. आणि त्यासाठी व्यापारी टिकला पाहिजे, असेही व्यास यांनी सांगितले.