Pune News : माजी सैनिकांना पुन्हा मिळणार लष्करी रुग्णालयाची सेवा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील माजी सैनिकांसोबत त्यांच्या पाल्यांना आणि पत्नीला पुन्हा लष्करी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. शहरातील खडकी, कमांडसारख्या लष्करी रुग्णालयांमध्ये माजी सैनिक पूर्वीप्रमाणे औषधं आणि उपचारासाठी जाऊ शकतात. माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना (ईसीएचएस) विभागानं ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळं गेल्या वर्षी माजी सैनिकांना आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी तसंच औषधांची खरेदी करण्यातसाठी सांगण्यात आलं होतं. उपचाराचे पैसे आणि औषध विभागाचे बिल हे ईसीएचएस विभागाकडे जमा केल्यास त्याचे पैसे पुन्हा देण्यात येणार होते. मात्र अनेक माजी सैनिकांनी सांगितलं होतं की, खासगी रुग्णालयातून नियमित उपचार घेताना अनेक अडचणी येत आहेत.

जिल्ह्याील जास्तीत जास्त माजी सैनिक दौंड, बारामती, शिरूर भोर तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात सुमारे 40 हजार माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि मुले धरून सुमारे 1 लाख 20 हजार लोकांना ईसीएचएस ची सुविधा दिली जाते अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण मंडळानं दिली आहे. सध्या कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होत आहे. अशात माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांना लष्करी रुग्णालयात नियमित औषधोपचारासाठी जाता येणार आहे.

घेता येणार सोयीनुसार अपॉईंटमेंट

आता ईसीएचएस मार्फत पू्र्व अपॉईंटमेंटची सेवा केली गेली आहे. त्यामुळं आता खडकी येथील लष्करी रुग्णालायत जाणाऱ्या माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीय सदस्यांना त्यांच्या सोईच्या तारखा आणि वेळेनुसार ईसीएचएसतर्फे पूर्व अपॉईंटमेंट देण्यात येत आहेत. यासाठी माजी सैनिकांना [email protected] यावर ईमेल करायचा आहे किंवा 9359374009 / 7666389439 या क्रमांकवरही ते संपर्क साधू शकतात. ईसीएचअसचे सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी ही माहिती दिली आहे.