फेसबुकची मैत्री महागात पडली; महिलेला 43 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर झालेली मैत्री एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, महागडी घड्याळे, सोन्याची चेन, ब्रेसलेट, अ‍ॅपल मोबाईल, अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने ४३ लाख ३५ हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्या कात्रज परिसरात राहतात.

जानेवारी महिन्यात एकाने त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानुसार महिलेने रिक्वेस्ट स्वीकारुन त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर करुन सायबर चोरट्याने महिलेशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने महिलेला महागडी घड्याळे, सोन्याची चेन, ब्रेसलेट, अ‍ॅपल मोबाईल, अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करीत कुरियर केल्याचे सांगितले.

कुरियर मिळविण्यासाठी कस्टमड्युटी, टॅक्स, आरबीआय टॅक्स, जीएसटी जमा करण्याचे कारण सांगून वेळोवेळी ऑनलाईनरित्या रक्कम स्वीकारली. तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपये वर्ग करुनही गिफ्टचे कुरिअर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.