Pune : सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत घोटाळा ! 19 मुलांना पास करण्यासाठी घेतली मोठी रक्कम, लष्करातील क्लार्क अन् एजंटला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेतील भरती घोटाळा पुणे पोलीस व सैन्य दलाने आज उघडकीस आणत एका लष्करी क्लार्क आणि एजंटला पकडले आहे. त्यांनी जवळपास 19 मुलाना पास करण्यासाठी प्रत्येकी 3 ते 4 लाख रुपये घेतल्याचे समजते, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

वेनसिंग लालासिंग रावत (वय 45, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा मूळ – अजमेर, राजस्थान) व क्लार्क रवींद्र राठोड (रा राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज वानवडी येथील लष्करी कार्यालयात सैन्य भरतीची लेखी परिक्षा होती. या परीक्षेत राज्यभरातून मुले आली होती. दरम्यान आर्मीच्या गुप्तवार्ता विभागाला आजच्या परीक्षेत गैर प्रकार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या विभागाने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मदतीला घेतले.

यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथक याठिकाणी पाठवले. यावेळी गुन्हे शाखा आणि लष्करी पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी रावत हा क्लार्क राठोड याच्या मदतीने 19 मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 3 ते 4 लाख रुपये ठरवून घेतले होते. तसेच त्यांना पेपर पास करून देण्याचे ठरले असल्याचे सांगितले. यानुसार या दोघाना पकडून वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडे आणखी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.