Pune : पुण्यातील डेक्कन परिसरात कोरोना टेस्टचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जंगली महाराज रोडवरील लॅबकडून देण्यात आली तक्रार, दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या एका टोळीचाच पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सागर अशोक हांडे (वय 25, रा. संगम चौकाजवळ, मूळ. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय 21, रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रशासन त्याला लगाम लावण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. कडक निर्बंध लावले जात आहेत. तर दुसरीकडे शहरात सरकारीपेक्षा अधिक खासगी लॅबमधून टेस्टिंग देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये काही जण गफलत करत असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलीस लक्ष ठेवून होते.

यावेळी डेक्कन पोलिसांना जंगली महाराज रस्त्यावरील एका लॅबच्या नावाने कोरोनाचे बनावट रिपोर्ट देत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस तपास करत होते. याबाबत या लॅबच्या वतीने रुपेश नाळे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली आहे. त्यांनी चाचणीचे बनावट अहवाल देत असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांनी अनेकांना रिपोर्ट दिले असल्याचे समोर आले आहे. तसेच या टोळीत आणखी काहीजण असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक अभिजित कुदळे, पथकातील इनामदार, शिंदे, पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.