पुण्यात जप्त केलेल्या बनावट नोटांचा आकडा 87 कोटीपर्यंत गेला, 6 जणांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या पकडण्यात आलेल्या भारतीय चलनाच्या नोटा मुंबईतील भेंडी बाजारातून आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून 87 कोटींचे बनावट भारतीय चलन जप्त केले आहे. दरम्यान त्या 6 जणांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेख अलिम समद गुलाब खान (वय ३६,रा. प्रतीकनगर, येरवडा), सुनील सारडा (वय ४०), अब्दुल गणी रहेमत्तुला खान (वय ४३), अब्दुर रहेमान अब्दुलगनी खान (वय १८), रितेश रत्नाकर (वय ३४), तुफेल अहमद महमद खान (वय २८) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या ची नावे आहेत.

शेख अलिम खान हा लष्कराच्या बाँबे सॅपर्समध्ये नाईकपदावर नेमणुकीस आहे. विमाननगर येथे बनावट नोटांचा साठा असल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला (एमआय) मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, खंडणी व अमली विरोधी पथकाचे राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकाने आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सापळा कारवाई करून आरोपींना पकडले. त्यानंतर बंगल्याची पाहणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा करून ठेवल्याचे समोर आले. रात्री उशीरापर्यंत बनावट नोटा मोजण्याचे काम सुरू होते. आज एकूण ८७ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. तर २ लाख ९० हजारांची रोकड जप्त केली आहे.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बनावट चलन मुंबईतील भेंडी बाजारातून आणले असल्याचे समोर आले आहे. तर बनावट चलनाचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी करणार होते. धक्कादायक म्हणजे, स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखविणारे व्हिडीओ तयार केले होते. हे व्हिडीओ व्हायरल करून ते फसवणूक करणार होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक अंजुम बागवान याप्रकरणाचा तपास करत आहेत.