Pune : शहरात बनावट ऑईल पेन्ट तयार करून विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात बनावट “ऑईल पेंट” तयार करून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकत तबल 9 लाख रुपयांचे ऑईल पेंट जप्त केले असून, त्याची नामांकित अश्या कंपनीच्या नावाने विक्री करण्यात येत होती. वारजे येथे हे पेंट पत्र्याच्या शेडमध्ये तयार केले जात होते.

याप्रकरणी संजय रामप्रित शहाणी (वय 37, तपोधम, वारजे) याला अटक करण्यात आली आहे. तर नरेश गोयल (दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद राधेशाम प्रसाद (वय 24, रा. दिल्ली) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आनंद प्रसाद हे एशियन पेंट कंपनीमध्ये एक्सपर्ट म्हणून काम करतात. दरम्यान पुण्यातील एका ग्राहकाने वारजे माळवाडी येथील शुभम सेल्स अँड केमिकल वितरक या दुकानातून एशियन पेंट खरेदी केला होता. मात्र तो बनावट असल्याचे त्यांचे लक्षात आले. यामुळे त्यांनी कंपनीकडे तक्रार केली. कंपनीने याची गंभीर दखल घेतली. तसेच, फिर्यादी यांनी या पेंटची तपासणी केली. त्यात हा पेंट कंपनीकडून तयार झाला नसल्याचे व तो कंपनीचा नसल्याचे सिद्ध झाले. मग फिर्यादी यांनी पेंट खरेदी केलेल्या दुकानात जाऊन परत पेंट खरेदी केला. यावेळी हा पेंट बनावट असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी शुभम सेल्समध्ये बनावट पेंट विक्री होत असल्याबाबत वारजे पोलिसांकडे तक्रार केली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित, उपनिरीक्षक येवले व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तसेच पेंट जप्त केले. यावेळी आरोपी हा एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पेंट तयारकरून तो एशियन पेंट व इतर नामांकित कंपन्यांच्या नावावर विकत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून 8 लाख 97 हजार 400 रुपयांचा बनावट पेंट जप्त करण्यात आला आहे. शहरात बनावट पेंट विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील आरोपी नरेश गोयल हा कच्चा माल शहाणी याला देत होता. शहाणी हा वारज्यात बनावट पेंट तयार करून त्याची शहरात विक्री करत होता. हा प्रकार कधीपासून सुरू आहे. आणि त्यांनी कोणाकोणाला पेंट विक्री केली याचा तपास सुरू आहे. आता दिल्लीतील गोयलचा शोध पोलीस घेत आहेत. तो देशात अश्या प्रकारे कच्चा माल पुरवत असल्याची शक्यता आहे.