पुण्यातील रविवार पेठेमधील 3 दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून सराईताला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय २६, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विविध प्रकारचे तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. त्यानुसार फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. चिखली परिसरातील कुदळवाडीकडे जाणाऱ्या एका पेट्रोलपंपावर आरोपी मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, मोहन दळवी, सचिन सरपाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील अधिक तपास करीत आहेत.