International Woman’s Day 2020 : महिला दिनी फरासखाना वाहतूक विभाग महिलांच्या कायमस्वरूपी हाती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिला दिनानिमित्त पुणे पोलिसांचा फरासखाना वाहतूक विभाग आता कायमस्वरूपी महिलांच्या हाती देण्यात आला असून, रविवारपासून महिला अधिकारी अन कर्मचारी धुरा सांभाळणार आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी येरवडा पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिलांच्या हाती दिल्यानंतर आता वाहतूक विभागही महिलांकडे सोपविला आहे. पथकात 36 महिलांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक स्वाती थोरात या इन्चार्ज असणार आहेत.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यात मध्यवस्थीची वाहतूक कायमच डोकेदुखी असते. कायमच परिसरात वर्दळीचा असतो. त्यात व्यापार वेगवेगळी दुकानांमुळे प्रचंड गर्दी असते.

जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या कामाची पावती म्हणून फरासखाना वाहतूक विभागाची संपुर्णतः जबाबदारी महिलांकडे सोपिवण्यात आली आहे. विशेषतः पीकअव्हर्समध्ये वाहतूकीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सण, उत्सव व समारंभावेळी महिला कर्मचार्‍यांचे कसब पणाला लागणार आहे.

फरासखाना वाहतूक विभागातंर्गत कापड व्यवसायिक, होलसेल वस्तूंचे विक्रेते, विविध कंपन्यांचे शोरुम, खासगी कार्यालयांचा समावेश आहे.

कामानिमित्त दररोज हजारो वाहनचालक मध्यवस्थीत येतात. तसेच, या परिसरातून वाहतूक होते. सकाळी आणि सायंकाळी परिसरातील वाहतूक सुरळित ठेवणे, बेशिस्तांना शिस्त लावणे, पार्किंग प्रश्न विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ट्रीपलसीट, झेब्रा क्रॉसिंग यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कारवाई आता महिलांच्या हातात आहे.

महिला पोलीस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक के. बी. म्हस्के यांच्यासह 36 महिलांकडून वाहतूकीचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.