Pune : PMPML च्या E-बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे 5 रुपयांनी वाढणार !

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन –  स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या ई बसेस खर्चिक ठरत असल्याने ई बसचे प्रत्येक टप्प्याचे भाडे पाच रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने तयार केला आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसभर फिरण्यासाठी ४० रुपयांच्या पासचे अमिष दाखवताना फायद्यात असलेल्या लॉंगरुटवरील थांबे कमी करुन दोन्ही शहरात व शहराबाहेरील ‘कामगारवर्गाची’ गळचेपी करण्याचा व्यावसायीक प्रस्ताव आणला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी २०२०-२१ या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये घोषित केलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात ५ रुपयांत प्रवास योजनेला या प्रस्तावांमुळे छेद दिल्याने गुरूवारी (दि.१) होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

कोरोनामुळे सहा महिने बंद असलेली पीएमपी सेवा नुकतीच सुरू झाली आहे. कोरोनामुळे पीएमपीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. सध्या पीएमपीची सेवा काहीअंशी सुरू झाली असली तरी फिजिकल डिस्टंसिंगमुळे प्रवासी संख्येवर मर्यादा येत आहे. तर त्याअगोदरपासूनच पीएमपीचा तोटा ३०० कोटींच्या पुढे गेला आहे. पीएमपीकडे थकबाकी असल्याने सीएनजी पुरवठा धारकांनी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनामुळे दोन्ही महापालिकांची आर्थिकस्थिती कोलमडली असताना पीएमपीने संचलनातील तूटीसाठी महापालिकांकडे तगादा लावला आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून बाजारपेठा अद्याप सुरळीत झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पीएमपी प्रशासनाने भाडेरचनेत बदल करतानाच काही नव्या सेवा देण्याचे प्रस्ताव आणल्याने सत्ताधारी भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अंदाजपत्रकामध्ये शहराच्या मध्यवर्ती जुन्या पेठांच्या भागात ५ रुपयांमध्ये वर्तुळाकार बससेवा देण्याची योजना मांडली आहे. आर्थिक कारणास्तवर तिची अंमलबजावणी होत नसतानाच पीएमपी प्रशासनाने पुण्यात दिवसभरात ४० रुपयांत प्रवास करण्याची योजना पुढे करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ४० रुपयांत प्रवासाची सुविधा देताना फायद्यात असलेल्या लांबच्या मार्गांवरील बसथांबे निम्म्याने कमी करण्याची एक्सप्रेस बस सेवेची योजना पुढे केली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दररोज ये जा करणारा कामगार वर्ग तसेच विद्यार्थी वर्गासाठी हे अडचणीचे ठरणार आहे. यासोबतच विशिष्ट मार्गावर विनाथांबा बससेवेचाही प्रस्ताव दिला आहे. यामुळे निश्‍चित काही वर्गाला फायदा होणार असला तरी अनेकांची गैरसोय तसेच पीएमपीच्या तोट्यात भरच पडणार आहे. तसेच यामुळे वडाप सेवेला अधिक फायदा होणार असल्याचा मतप्रवाहही पुढे येत आहे.
सध्याचा कोरोनाच्या संसर्गामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्न घटलेले असताना प्रशासनाने आणलेल्या योजनांबाबत घाईगडबड आणि कुरघोडीचे राजकारण होत असल्याचा सूर उमटत आहे. याबाबत संचालकमंडळ गुरूवारी होणार्‍या बैठकीत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता मात्र वाढली आहे.