Pune : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीची साठमारी रोखण्यासाठी मागिल तीन आठवड्यापासून विकेंडला शनिवार-रविवार कडक निर्बंध आणि इतर दिवशी सकाळी सात ते अकरा दरम्यान भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी आहे. मात्र, शेतामध्ये तयार झालेला भाजीपाला विक्री केला नाही, तर खराब होऊन जातो. त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊ लागल्यामुळे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

कोरोना महामारीची साठमारी सुरू असून भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकने दररोज सकाळी चार तास सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कडक निर्बंधामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने भाजीपाल्याला भाव मिळत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. लग्नसराईतील उपस्थितीवर निर्बंध, तसेच राज्यभरातील उपहारगृहे, खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या बंद आहेत, त्यामुळे भाजीपाला वाया जाण्याचे प्रमाण अधिक झाले आहे.

राज्यभरातील घाऊक भाजीपाला बाजारातील गर्दीला आवर घालण्यासाठी प्रशासनाने बाजार आवाराच्या कामकाजांसाठी कडक नियमावली लागू केली. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डासह उपनगरातील भाजीपाला मार्केटमधील घाऊक भाजीपाला आणि गूळ-भुसार बाजार आठवड्यात शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बंद ठेवले जात आहेत. अशा परिस्थितीत घाऊक बाजारात शेतीमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसमोरप अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीमाल नाशवंत असल्याने विक्री न झालेला माल परत घेऊन जाता येत नाही. निर्बंधामुळे किरकोळ खरेदीदार हात आखडता ठेवून भाजीपाला खरेदी करत आहेत. एरवी दोन ते तीन पोती भाजीपाला घेणारा किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेता खरेदी कमी प्रमाणात करतो आहे. किरकोळ भाजीपाला विक्री दुकानांवर वेळेचे बंधन असल्याने खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती मार्केटयार्डात भाजीपाला विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दिली. ग्राहकांना भाजी स्वस्त मिळत असली तरी, निर्बंधांमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.

घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे-मुंबईतील हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, खाणावळ चालकांकडून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र, लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळेही भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. किरकोळ बाजारातील खरेदीदारांकडून भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवले होते. यंदा निर्बंध असले, तरी नियमावलीचे पालन करून भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. मात्र, उत्पादनखर्चापेक्षा विक्रीखर्च जास्त होत असल्याने शेतमाल उत्पादकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजार समितीचे प्रमुख विजय घुले म्हणाले की, कोरोना महामारीची शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मागिल दोन-तीन दिवसांपासून शेतमालाची आवक कमी होत आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले, त्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. शेतमाल काढल्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांत मार्केटमध्ये येतो, त्यामुळे शेतमाल खराब होण्याचे प्रमाण कमी आहे. सकाळी 11 ते दीडच्या दरम्यान शेतकऱ्यांची वाहने अकरा वाजता बाजार आवारात घेतली जातात, त्यानंतर व्यापाऱ्यांची एक वाजता वाहने बाजार आवारामध्ये घेण्याचे नियोजन केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतर उपबाजारापेक्षा मांजरी उपबाजार हा शेतकरी ते ग्राहक अशी व्यवस्था आहे. त्यामुळे चार-पाच तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येथे आणत असल्याचे त्यांनी सांगितले.