Pune : बळीराजांचे ट्रॅक्टर चोरी करणार्‍या टोळीचा पुणे ग्रामीणच्या LCB कडून पर्दाफाश; 10 वाहनांसह 77 लाखांचा माल जप्त

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत तब्बल १० ट्रॅक्टर सह ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी चोऱ्यांचे गुन्हे थांबविण्यासाठी सूचना केलेल्या होत्या. तसेच पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक ही तपास करत होते.

यावेळी पोलिस विविध पद्धतीने तपास करत असताना, शिरूर शहरात राहणाऱ्या काही व्यक्ती या काही कामधंदा न करता चोरी ची वाहने आणतात अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सतीश अशोक राक्षे (मूळ. रा. बेलवांडी फाटा, ता. श्रीगोंदा, सध्या रा. बाबुराव नगर, शिरूर) यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, साथीदार ज्ञानदेव नाचबोने, धनु झेंडे, प्रवीण कैलास कोरडे, सुनील बिभीषण देवकाते या आरोपिसह विविध ठिकाणी २८ चोऱ्या केल्या होत्या. यानंतर पथकाने आरोपींकडून १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जीप, १ स्कॉर्पिओ, ६ मोटारसायकल, ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलण्याचे पान्हे, असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींनी पुणे जिल्ह्यात १२ गुन्हे, अहमदनगर जिल्ह्यात ८ गुन्हे तर सोलापूर जिल्ह्यात एक गुन्हा केला असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, जितेंद्र मांडगे, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, दीपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय जावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.