Pune : नवरात्रोत्सवात पुणे-पिंपरीत सोन साखळया हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना फिल्मी स्टाईलनं पकडलं, 3.5 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नवरात्रोत्सवात पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सोन साखळ्या हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना खडक पोलिसांच्या पथकाने “फिल्मी स्टाईल” पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सचिन नरहरी पेशवे (वय ३६) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय २९ दोघेही रा. येवलेवाडी, मूळ- नागपूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरातील सोन साखळी, घरफोड्या, लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही केल्या या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. याबाबत गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना या घटना रोखण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी खडक पोलिसांच्या पथकातील पोलिस कर्मचारी अमेय रसाळ, समीर माळवदकर व बंटी कांबळे यांना सोनसाखळी चोरी करणारे सराईत खडीमशीन चौकातून ये-जा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खडीमशीन चौकात सापळा रचला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या सचिन व प्रेम याला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुचाकी दामटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी शुक्रवार पेठे, यमुनानगर, निगडी, संभाजीनगर, चिंचवड परिसरातील जेष्ठ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविल्याची कबुली दिली.

वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, कर्मचारी अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, अमेय रसाळ, रवी लोखंडे, रोहन खैरे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.

दोघे अट्टल गुन्हेगार..
सचिन व प्रेम अट्टल गुन्हेगार आहेत. सचिनवर 39 गुन्हे दाखल आहेत. तर प्रेम याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. सचिन हा नागपूर, अमरावती जिल्ह्यातील अट्टल सोन साखळी चोर आहे. दीड महिन्यांपुर्वी तो नागपूर सेंट्रल जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आला आहे. त्याचा साथीदार प्रेम खत्री हा नागपूर, मध्यप्रदेशमध्ये वाहनचोरी, घरफोडी गुन्ह्यात सराईत आरोपी आहे. २०१५ साली तो नागपूर सेंट्रल जेल तोडून पळाला होता. त्यानंतर त्याला शोधून अटक करण्यात आली होती. चार महिन्यांपुर्वी तो कारागृहाबाहेर आला आहे.