Pune : अखेर ‘गाडीखाना दवाखान्या’ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी रुगणालयातील डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर इंजेक्शनची मागणी केली जात आहे. खुल्या बाजारात ही इंजेक्शन मिळण्यात अनंत अडचणी येत असल्याने सर्वजण महापालिकेकडे मागणी करत आहेत. विशेष असे की आजतर काही माननीयांनी थेट महापालिकेच्या गाडीखाना रुगणालयातील औषधालयात गर्दी केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेर याठिकाणी पोलीस बोलावून बंदोबस्त लावण्याची वेळ प्रशासनावर आली.

मागील दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अवघ्या काही दिवसात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या तेराशेहुन पन्नास हजारांपर्यंत पोचली आहे. तर गंभीर रुग्णसंख्याही एक हजारांच्या पुढे गेली आहे. जवळपास शहरातील महापालिका, शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णलयात साडेसहा हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्ह्यातून व अन्य शहरातून येणाऱ्या रुग्णसंख्या देखील वेगळीच आहे.

महापालिकेच्या रुग्णालायत ही दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतांश रुग्णलयाकडून गंभीर रुग्णांसाठी रेमडीसीविर इंजेक्शन प्रिफर केले जात आहे. त्याचवेळी दुसरिकडे रुग्णालयांकडे ही इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितले जात आहे. पुण्यातील होलसेल औषध विक्रेते काही प्रमाणात हे इंजेक्शन उपलब्ध करून देत आहेत. मात्र उपलब्धतेपेक्षा मागणी अधिक असल्याने इंजेक्शन मिळवण्यासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेने देखील स्वतःच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रेमडीसीविर इंजेक्शन खरेदी केली आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महापालिकेकडून इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महापालिकेकडूनही स्वतःच्या रुग्णलायातील गरज पाहून स्वतःकडील इंजेक्शन देण्यात येत होती. परंतु दिवसेंदिवस महापालिकेचीही गरज वाढल्याने आणि पुरवठा कमी होत असल्याने पालिकेच्या रुग्णलायातील रुग्णांना इंजेक्शनची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडून खासगी हॉस्पिटल कडून मागणीसाठी येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या साठी प्रयत्न करणारे माननीय , कार्यकर्ते गाडीखाना येथे गर्दी करू लागले आहेत. आजतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर प्रशासनाने औषधालय बंद केले. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेल्याने गाडीखाना रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे.