Pune : अखेर समाविष्ट गावातील नगरसेवकांच्या प्रशासकीय अडचणीबाबत महापालिका आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा महापालिकेत समावेश झाला. मागीलवर्षी विविध ठिकाणच्या गावांत पोटनिवडणूक होउन २ नगरसेवक निवडूणही आले. मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील प्रशासकीय व विकासकामे ही लगतच्या क्षेत्रिय कार्यालयातून करताना या दोन्ही नगरसेवकांची तसेच नागरिकांचीही मोठी अडचण होत होती. या पार्श्‍वभूमीवर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा ४२ क्रमांकाचा भौगोलिक विचार करून हे भाग अनुक्रमे हडपसर- मुंढवा आणि सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयांना जोडण्याचा आदेश आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.

मागीलवर्षी पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या लोहगाव, मुंढवा (उर्वरीत भाग), केशवनगर, फुरसुंगी, उरूळी देवाची, साडेसतरा नळी, उंड्री या पुर्वेकडील गावांसह आंबेगाव खुर्द व बुद्रुक, धायरी व शिवणे (संपुर्ण उत्तमनगर) या भागासाठी पोटनिवडणूक झाली. लोकसंख्येचा विचार करून याठिकाणी दोन सदस्यीय प्रभाग म्हणून अस्तित्वात आला. मात्र, भौगोलिक दृष्टया ही सर्व गावे वेगवेगळ्या चार क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारीत येत असल्याने येथून निवडूण आलेल्या नगरसेवकांना कामे करताना अडचण येत होती. तसेच नगरसेवक व नागरिकांना प्रशासकिय कामातही अडचण येत होती.

विशेष असे की येथून विजयी झालेले नगरसेवक गणेश ढोरे हे देवाची उरूळी परिसरातील असून नगरसेविका स्वाती पोकळे या धायरी परिसरातील आहेत. भौगोलिकदृष्टया अडचणीचे ठरत असल्याने हे दोन्ही नगरसेवक आपआपल्या परिसरावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांना येणारी अडचण लक्षात घेउन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रभाग क्र. ४२ अ हा हडपसर – मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाला जोडण्याचा तसेच प्र.क्र. ४२ ब हा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाला जोडण्याचा आदेश आज दिला आहे.