पुणे : मुस्लिमांना धमकी दिल्याप्रकरणी मनसेच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारनगर परिसरातील भारतीय मुस्लिमांच्या घरात घुसून त्यांना तुम्ही बांगलादेशी नागरिक असून, तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नसल्याची धमकी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनसेच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनसेचे अजय शिंदे आणि त्यांच्या इतर 7 ते 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजीनगर येथील गुलमोहर अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. दरम्यान, मनसेचे अजय शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते तीन दिवसांपुर्वी त्यांच्या घरात घुसले. त्यांना घराच्या बाहेर काढून त्यांना तुम्ही बांगलादेशी आहात, तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणीक हे करत आहेत.