पुण्यातील MPM ग्रुप कंपनीच्या मालकावर FIR, कामगारांच्या PF रक्कमेचा 46 लाखांचा अपहार

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल टॉवर कंपन्यांना शंभरहून अधिक कामगार पुरविल्यानंतर त्यांच्या प्रॉव्हिडंड फंडात (पीएफ) पैसे न भरता 46 लाख 52 हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह भागीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुनील रणधिर (वय 55, रा. हडपसर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलेश झाडबुके यांच्यासह भागीदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील एका सेल्युलर कंपनीत अ‍ॅडमिन मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. सप्टेंबर 2012 ते जुलै 2014 कालावधीत त्यांच्या मोबाईल कंपनीचे टॉवर उभारायचे होते. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळासाठी सुनील यांनी कंपनीच्यावतीने नीलेश यांच्या एपीएम ग्रुपकंपनीकडे करार केला. त्यानुसार नीलेश यांनी सुनील यांना 100 हून अधिक कामगार पुरविले.

त्यानंतर सेल्युलर कंंपनीच्यावतीने सर्व कामागारांचा पीएफ देण्यात येत होता. मात्र, नीलेशसह एपीएम ग्रुप कंपनीने कामगारांच्या पीएफची रक्कम स्वतःच्या ताब्यात घेउन अपहार केला. कामगारांना पीएफची रक्कम न देता 46 लाख 52 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. एल. झांजुर्णे अधिक तपास करीत आहेत.