काय सांगता ! होय, पुण्यात ‘कोरोना’ रूग्णाला एका हॉस्पीटलमधून दुसर्‍या रूग्णालयात नेण्यासाठी 8 हजार रूपये भाडे, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी संजीवनी रुग्णवाहिका सर्व्हिसेसने तबल 8 हजार रुपये भाडे घेतल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दरम्यान याची चौकशी सुरू असताना आरटीओकडे संबंधित रुग्णवाहिकेची नोंदणी ही मोबाईल क्लिनिक व्हॅन म्हणून असल्याचे दिसून आले. रुग्णवाहिका म्हणून वापर केला गेला आहे.

याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी (वय 41) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजीवनी ऍम्ब्युलन्स सर्व्हिसेसवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डेक्कन भागातील एका रुग्णालयातून म्हात्रे पुलाजवळील रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण घेऊन जायचा होता. संबंधित नातेवाईकानी रुग्णवाहिका बोलावली. पण त्यावेळी त्यांनी काही अंतर घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून भाड्यापोटी 8 हजार रुपये घेतले. याबाबत नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाने तक्रार केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने आरटीओ प्रशासनास याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ही चौकशी सुरू असताना या रुग्णवाहिकेची आरटीओ नोंदणी ही मोबाईल क्लिनिक व्हॅन म्हणून असल्याचे उघड झाले. पंरतु प्रत्यक्षात त्याचा वापर रुग्णवाहिका म्हणून केला जात होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने संजीवनी सर्व्हिसेसवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक लिट्टे हे करत आहेत.