IT कंपनीत जबरदस्तीने घुसून ‘कोरोना’ची बाधा झाल्यास कंपनी जबाबदार असल्याची दमदाटी केल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्यास विनंती करण्यात आल्यानंतर पुण्यात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेने व काही जणांनी नगर रस्त्यावरील आयटी कंपनीत जबरदस्तीने घुसून कोरोनाची बाधा झाल्यास कंपनी जबाबदार असल्याची दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विशाखा गायकवाड आणि अन्य तीन अशा चौघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल शिंदे (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी होत्या. सध्या त्या सामाजिक कार्य करतात. दरम्यान फिर्यादी हे येथील एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांच्या कंपनीत शेकडो कामगार आहेत.

जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. राज्यात देखील या आजार बळावत असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शक्य असल्यास वर्क फ्रॉर्म होम करण्याची विनंती केली होती. मात्र अनेक आयटी आणि इतर कंपन्या कामगारांना कामावर बोलवत होते. तर काही कंपन्यांनी वर्क फ्रॉर्म होम देखील केले होते.

फिर्यादी यांच्या कंपनीने मात्र असे केले नव्हते. त्यामुळे विशाखा गायकवाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी (दि 21) या कंपनीत जबरदस्तीने प्रवेश केला. तसेच येथील अधिकाऱ्यांना दमदाटी करत त्यांना कोरोना आजाराची कोणाला बाधा झाल्यास कंपनी जबाबदार राहील असे म्हणत कंपनी बंद करण्यास सांगितले.

या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.