Pune : बिबवेवाडीत खून, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता वाहनांच्या तो़डफोडीचा FIR, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीत एक खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा प्रकार घडल्यानंतर त्याच परिसरात टोळक्याने अचानक येत रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. हे देखील कडकडीत लॉकडाऊनमध्ये झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रणजित राजू सावंत (वय 19) व आदेश राजेंद्र गोरड (वय 21,रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर इतर आरोपी पसार झाले आहेत. याबाबत पंढरीनाथ दारवटकर (रा. राजीव गांधीनगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राजीव गांधीनगर परिसरात राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्यावर पार्क केली होती. यादरम्यान शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने पेव्हर ब्लॉक व हातातील बांबूच्या सहाय्याने पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर परिसरात तुफान राडा घातला आणि टोळके पसार झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपी पसार झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक लिटे हे करत आहेत.