खडकवासला परिसरात खंडणीसाठी तरुणावर गोळीबार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – खडकवासला भागात मध्यरात्री खंडणी उकळण्यासाठी तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा.रायकर मळा, धायरी) असे जखमी झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजू सोनवणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांचा इलेक्ट्रिक साहित्य निर्मितीचा व्यवसाय आहे. ते खडकवासला परिसरातील लांडगे वस्ती येथे राहायला आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोनवणे यांना भेटण्यासाठी मित्र विजय आला होता. त्यावेळी घरानजीक लपून बसलेल्या हल्लेखोरांनी सोनवणेंच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, अंधारात झालेल्या गोळीबारात चव्हाण याच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चव्हाण यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सोनवणे यांच्याकडे सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागातील एका गुंडाने खंडणी मागितली होती. त्यावेळी त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.