पुण्यातील पिंपरीच्या मिलिंदनगर मध्ये पिस्तूल खरं की खोटं दाखवण्यासाठी गोळीबार, मित्र गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राकडे असलेले पिस्तूल खरे आहे की खोटे हे पाहत असताना, पिस्तूल खोटे असल्याचे मित्र म्हटल्याच्या रागातू मित्रावर गोळीबार करण्यात आला. पिस्तूलातील गोळी लागून मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार मिलिंदनगर, पिंपरी येथे रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला आहे.

गुरप्रीत हरदेवसिंग जावंद (22, रा. पिंपरी) हा जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सन्नी परदेशी उर्फ रोकडे याच्यावर खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंदनगर, डीलक्स मॉल समोर ,पिंपरी गाव पिंपरी याठिकाणी गुरप्रीत हरदेवसिंग जावंद व त्याचा मित्र सिद्धांत सुनील बहोज हे दोघे रिक्षामध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गुन्हेगार सन्नी परदेशी उर्फ रोकडे त्यांचे जवळ आला.

त्याच्याकडे एक पिस्तूल होते. हे पिस्तूल ओरिजनल आहे की डुप्लिकेट यावरून त्यांच्यात चर्चा सुरु होती. त्यावेळी गुरप्रित याने पिस्तूल खोटे असल्याचे म्हटले. यावरून चिडून सनी परदेशी याने गुरप्रित याच्या दिशेने एक राऊंड फायर केली. ती गोळी गुरप्रीत सिंग जावद याचे डाव्या खांद्याला मध्ये लागली. यामध्ये गुरप्रित हा जखमी झाला आहे. त्याच्यावर वाय सी एम हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच रात्रपाळीचे अधिकारी उपनिरीक्षक केंगार, प्रभारी नाईट राउंड अधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी कळविले धाव घेतली.