पुण्यातील हांडेवाडी रोडवर गोळीबाराचा थरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – साथीदारांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगाराच्या टोळीने बांधकाम व्यावसायिकाच्या कारचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला जखमी करण्याची घटना मध्यरात्री घडली. हांडेवाडी रोड ते हडपसर पोलीस ठाण्यादरम्यान मध्यरात्री एक वाजता हा थरार घडला.

निलेश शेखर बिनावत (वय २५, रा. केशवानंद बंगला, हांडेवाडी) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची महंमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. येथील रेल्वे लाईन परिसरात शुक्रवारी बिनावत आणि टिपू पठाण यांच्या साथीदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी टिपू पठाणच्या मुलांनी बिनावतच्या साथीदारांना मारहाण केली. हा प्रकार समजताच बिनावतचे समर्थक टिपू पठाण याच्या घरावर चाल करुन गेले. त्यांनी त्याच्या घरावर जोरदार दगडफेक केली. परिसरात रस्त्याकडेला लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली. हे समजताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे समजताच सर्व जण पळून गेले. त्यानंतर संतापलेल्या टिपू पठाण व त्याचे १० ते १२ साथीदार हांडेवाडी रोडवरील बिनावत याच्या घराकडे मध्यरात्री आले.

त्यावेळी निलेश बिनावत हा आपल्या बहिणीला आणण्यासाठी त्याच्या लँड क्रुझर गाडीतून निघाला होता. त्याला पाहून टिपू पठाणच्या टोळीने पाठलाग सुरु केला. आपल्याला मारायला येत असल्याचे पाहून निलेशने जोरात गाडी चालविण्यास सुरुवात केली. तेव्हा दुचाकीवरुन काही जण त्याच्या पुढे गेले. त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यात निलेश जखमी झाला. पण त्याची पर्वा न करता त्याने प्रसंगावधान राखत आपली गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात नेली. तो पोलीस ठाण्यात गेल्याचे पाहून पाठलाग करणारे पळून गेले. पोलिसांनी निलेश बिनावत याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यातील एकाला अटक केली आहे.